छत्रपती संभाजीनगर (सांजवर्ता ब्युरो) : सिमेंट रस्ते फोडण्यासाठी ब्रेकरचा वापर न करता कटरचा वापर करावा. कटर मशीन असलेल्या कंत्राटदारालाच कामे देण्यात यावी, ब्रेकरने रस्ते फोडल्यास त्यांना दंड लावा, असे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मंगळवारी (दि.२०) अधिकार्यांना दिले.
शहरातील अनेक रस्ते सिमेंट कॉक्रिटचे करण्यात आले आहेत. ड्रेनेज व पाणीपुरवठ्याची केबल टाकण्यासाठी रस्ते फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात १९०० किमीची अंतर्गत पाइपलाइन टाकण्यात येत असून, ११०० किमीची पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. हे काम करताना अनेक रस्ते ब्रेकरने फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
कटर मशीन असलेल्यांनाच कामे
रस्ते फोडण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे रस्ते फोडताना कोणी ब्रेकर वापरला तर त्याला जबर दंड लावण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. ज्या कंत्राटदाराकडे रस्ता कापण्यासाठी कटर मशीन नसेल त्याला कामही देऊ नका, असेही निर्देश त्यांनी शहर अभियंता संजय कोंबडे यांना दिले.














